औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील मतदानाला केवळ नऊ दिवसांचा अवधी शिल्लक असतानाही, कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांच्या प्रचाराकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेची तारीख अद्याप देखील निश्चित झालेली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते .
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणावर धाम धूम पाहायला मिळत आहे. 23 एप्रिल रोजी औरंगाबाद लोकसभा मतदार संघाकरिता मतदान होणार आहे. मतदाना करिता नऊ दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार करून वातावरण निर्मिती करण्यावर भर दिलेला आहे. एकीकडे युतीच्या उमेदवारा करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींच्या सहभाग घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून गर्दी खेचण्याची ताकद असलेले राहुल गांधी व प्रियंका गांधी हे दोनच चेहरे आहेत.त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेचे तर प्रियंका गांधी यांच्या रोड शोचे नियोजन करण्याचे काँग्रेसकडून प्रयत्न होत आहे.
परंतु त्याची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. काँग्रेसचा मतदारसंघ असलेल औरंगाबाद लोकसभा मतदार संघ यंदा राष्ट्रवादी करिता सोडावा अशी मागणी केली जात होती. मोठा प्रयत्नानंतर हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात काँग्रेसला यश आले. परंतु उमेदवार म्हणून झांबड यांची घोषणा होताच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यात आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षाच्या वतीने गर्दी खेचणाऱ्या नेत्यांच्या आयोजित करण्यात येणाऱ्या सभा व दुसरीकडे आघाडीतील वातावरण पाहता. मतदार संघात वातावरण निर्मिती करता राहुल गांधींच्या सभेची तर प्रियांका यांच्या रोड शो ची गरज लक्षात येते असे असताना मतदारांकरिता केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने पक्षाचा या दोन्ही इव्हेंट करिता तारीख निश्चित होत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही धाकधूक वाढत आहेत.